जवडे ग्रामपंचायतीने गावात अनोखा उपक्रम सुरु केला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नवविवाहीत दाम्पत्याने विवाहाचा दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन नवीन वृक्ष लागवड करायची आणि त्याची छायाचित्र देणे बंधनकारक आहे.
त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. ही अनोखा संकल्पना किंजवडे ग्रामपंचायतीने राबविल्यामुळे सर्वस्तरावरुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
किंजवडे गावाला एक ऐतिहासिक पण आहे. संपुर्ण गाव हा देवस्थान ईनाम गाव म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागामार्फत नागरिक आणि ग्रामीण क्षेत्रासाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम ‘माझी वसुंधरा अभियान’ आहे. याच अभियानाच्या माध्यमातून किंजवडे गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थांनी विवाह नोंदणीची एक नवीन संकल्पना राबविली आहे.
गावामधील विवाह झालेल्या व्यक्तींनी इतर कागद पत्रांबरोबरच आता आपल्या जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारचे दोन वृक्ष नवीन लागवड करुन त्या वृक्षांसोबत छायाचित्र काढून विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक केले आहे. ज्या व्यक्तींची जमीन कमी असेल किंवा घरमर्यादित असेल अश्या ग्रामस्थांनी देखील आपल्या घराच्या अंगणामध्ये कोणत्याही प्रकारची दोन वृक्ष लागवड करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात जमीन असेल अश्या शेतक-यांनी दोन पेक्षा जास्त वृक्ष लागवड करुही शकतात. यामुळे आपल्या उत्पनाचे साधनही वाढु शकते. यामुळे पडीक जमीन लागवडीखाली किंवा अन्य पिकाखाली येवू शकते.
वृक्ष लागवडीचा नारा शासन वेळोवेळी देत आहे. मात्र काही गावांमध्ये पर्यावरण दिनानिमित्त छायाचित्र प्रसिध्दीच्या मर्यादितच वृक्ष लागवड केली जाते. ही औचारिकता न राहता प्रत्यक्षात वृक्ष लागवड करुन त्याची मनापासून जोपासना झाली पाहिजे. व पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. आणि त्या वृक्ष लागवडीपासून उत्पन्न देखील सदर शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. याच हेतूने किंजवडे ग्रामपंचायतीने एक वेगळा संकल्प राबविला आहे. यासाठी गावचे सरपंच संतोष किंजवडे,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक शिवराज राठोड व गावातील ग्रामस्थ यांच्याच सहकार्यातून ही संकल्पना राबविली जात आहे.
किंजवडे गाव स्मार्ट ग्राम करण्यासाठी प्रयत्न
किंजवडे गावचे ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी किंजवडे गावचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी किंजवडे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व किंजवडे गाव स्मार्ट ग्राम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. यापुर्वी त्यांनी तालुक्यातील बापर्डे गाव जिल्हा स्मार्ट ग्राम बनविले आहे. तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये कोकण विभागामध्ये बापर्डे गाव प्रथम मिळवले आहे तसेच राज्य स्तरावर प्रथम येण्यासाठी त्यांनी नवनवीन उपक्रम गावामध्ये राबविले आहेत. तसेच अनेक शासनाच्या योजना राबवून बापर्डे गाव अग्रेसर ठेवण्यासाठी ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी मेहनत घेतली होती. त्याच धरतीवरती किंजवडे गाव आता शासनाच्या विविध अभियानामध्ये सहभाग घेवून पारितोषिक मिळून एक आदर्श गाव बनविण्यासाठी त्यांचा मानस आहे.