शाळेची अचूक गरज ओळखून कार्यरत होते ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर
चिपळूण :: तालुक्यातील अलोरे येथील मो. आ. आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालयातील ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर यांनी आपल्या ३६वर्षांच्या सेवेतून, दोन वर्षे निवृत्त कालावधीपूर्व ‘स्वेच्छा’निवृत्ती स्वीकारली. शैक्षणिक क्षेत्रात, आपल्या मर्यादा पुरेपूर ओळखून अमर्याद काम करण्याच्या ध्यासाने पछाडून जात नव्या आकाशाला गवसणी घालणारे काम करणाऱ्या वहाळकर यांची स्वेच्छानिवृत्ती ही नव्या ‘प्रकाशमान’ सामाजिक जीवनाचा प्रारंभ करणारी ठरणार आहे. आपल्या कारकीर्दीत शाळेची अचूक गरज ओळखून कार्यरत होत ‘शाळेचा समाजमाध्यमांवरील चेहरा’ बनलेल्या वहाळकर सरांची निवृत्ती शाळेच्या जगभरातील विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली.
शशिकांत वहाळकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, माजी मुख्याध्यापक अरुण के. माने, सौ. श्वेता वहाळकर, निमिष वहाळकर उपस्थित होते. शाळेच्या वतीने वहाळकर यांचा सन्मान करण्यात आला. वहाळकर यांनी अलोरेत कार्यरत होण्यापूर्वी दोन वर्षे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी.आय. मध्ये ‘वायरिंग इन्स्ट्रक्टर’ सेवा केली होती. स्व. गोविंदराव निकम यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना पुढील जीवनात उपयोग झाला. जून १९८७ पासून ते परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूल अलोरेमध्ये ‘तंत्रशिक्षण निदेशक’ म्हणून कार्यरत होते. सेवा काळात त्यांनी तंत्रशिक्षण विषयातील थेअरी व प्रात्यक्षिकाचे ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. पुढील जीवनात अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळलेल्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग झाला. शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत मूल्यशिक्षण, देशभक्तीपर गीते, पर्यायी तासिकांमध्ये मराठी विषयातील पाठयपुस्तकातील कविता चाली लावून विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेणे, संस्कृतवाचन, वक्तृत्व स्पर्धांना जाणाऱ्या शालेय तयारी ज्येष्ठ शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार करुन घेणे, शाळेचा सहल विभाग, प्रौढ साक्षरता अभियान, संस्कृत विभाग, स्नेहसंमेलन रंगमंच व्यवस्था, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या गायन स्पर्धांचे समन्वयक, समूह गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा शाळेच्या ध्वनी व्यवस्था विभागाचं काम, शालेय फलकलेखन, शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, शाळेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात डॉ. रामचंद्र देखणे यांच्या दिंडी आणि भारुड कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग, अलोरे शाळेचा २०१८चा नामकरण सोहोळा आणि गेल्यावर्षी संपन्न झालेल्या सुवर्ण महोत्सवी समारंभात माजी विद्यार्थी संपर्कप्रमुख जबाबदारी पार पाडलेल्या वहाळकर सरांनी गेली १०वर्षे एस.एस.सी. बोर्डाचे तंत्रशिक्षण विषयाचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते.
वहाळकर यांनी बोलताना, ‘व्यक्तिगत जीवनाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या शालेय व्यवस्थापनाचे आभार मानले. पुढील काळात सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी भरभक्कम अनुभवाची शिदोरी येथे प्राप्त झाल्याचे म्हटले.’ शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी बोलताना, शिक्षकासाठी आवश्यक असलेले सारे ‘अनुसरणीय’ गुण वहाळकर सरांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटल्याचे म्हटले. शाळेचे ज्येष्ठ निवृत्त शिक्षक रामचंद्र खोत यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून वहाळकर यांना ‘माणूस जोडणारा वेडामाणूस’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
सहशिक्षक सुवारे यांनी बोलताना, वहाळकर सरांनी आयोजित केलेल्या ‘कन्याकुमारी दर्शन’ सहलीची आठवण सांगितली. ‘तंत्रशिक्षक’ सुनील लांजेकर यांनी वैयक्तिक जीवनातील आठवणी सांगितल्या. चंद्रकात राठोड यांनी, ‘कवी मनाचा माणूस’ अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. श्वेता वहाळकर, निमेश वहाळकर, जीवन पाटील, गौरी बापट, शाळेचे लिपिक चुनकीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गोळपकर यांनी केले. आभार पर्यवेक्षिका श्रीमती गमरे यांनी मानले.