जाकादेवी/ वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या जगप्रसिद्ध देवस्थानची माहिती अंध व्यक्तींना अवगत व्हावी, यासाठी गणपतीपुळे देवस्थान मार्फत तयार करण्यात आलेल्या ब्रेल लिपीतील देवस्थानच्या सविस्तर माहिती पुस्तिकेचा शानदार प्रकाशन सोहळा शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी१०.३० वा. भक्त निवास गणपतीपुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे .
सदरचा प्रकाशन सोहळा दापोली येथील प्रकाशन सहाय्यक श्री. भरत जोशी तसेच गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच व पंच कमिटी संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुस्तिकेमुळे देश- विदेशातील अंध व्यक्तींना या संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या धार्मिक स्थळाची माहिती उपलब्ध होणार आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी स्नेहज्योती अंध विद्यालय दापोली येथून २० मुले येणार आहेत. या विशेष मुलांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रमही या ठिकाणी सादर होणार आहे. तरी परिसरातील नागरिक तसेच भाविकांनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे कमिटीचे अध्यक्ष श्री.विनायक राऊत यांनी केले आहे.