रत्नागिरी : हवामानातील बदलांचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या पंतप्रधान पीकविमा योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातील भात पिकाचा ८ हजार १०६, तर नाचणीचा ३०६ असा मिळून ८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे.
३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गतवर्षी ३२०० शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला.
पूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पीकविमा योजना शासनाने जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भात आणि नाचणी या दोन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भातासाठी हेक्टरी ५० हजार तर नागलीसाठी २० हजार विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. सध्या भात लावणीची कामे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांकडून विमा उतरवण्यासाठी वेळ मिळालेला नव्हता. गेले काही दिवस मुसळधार पावसामुळ जनजीवनही विस्कळित होते. परिणामी शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पिकांचे मिळून ८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे २२०२.१४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. जिल्ह्यातून १० कोटी ८१ लाखांची रक्कम संरक्षित झाली आहे.
एक रुपयात विमा हा फार्सच अडीचपट वाढ
जिल्ह्यात भातशेतीचे उत्पादन चांगले असल्यामुळे पीकविमा निकषातील तरतुदींमुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी उत्सुक नसतात. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या वेळी विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यानंतर विमा उतरवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. गतवर्षी ३२०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. यंदा त्यात अडीचपट वाढ झाली आहे.
आंबा, काजूचा ३२ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येत आहे. शेतकरी हिश्शाची पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता एक रुपया वजा जाता उर्वरित फरकाची रक्कम राज्य शासन भरणार आहे. मुदत वाढवण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.
तालुका भात नाचणी (हेक्टर) क्षेत्र
राजापूर ५१३ २१ १६८.४७
लांजा ४२८ ३४ १३५.८६
रत्नागिरी ५५२ २८ १२०.१९
संगमेश्वर १३६४ २३ ३८९.३३
चिपळूण १०४९ २७ ३५९.५३
गुहागर २९३ ३७ १००.३७
खेड १७३१ ३८ ४७८.३४
दापोली १०३६ ५० २३८.१४
मंडगणड ११४० ४८ २११.९१