‘या’ अवयावरील केस काढल्याने संताप
दापोली:-तालुक्यातील ओमळी येथील सामान्य कुटुंबातील निलिमा चव्हाण हिचा मृतदेह मंगळवारी दाभोळ खाडीत आढळून आला. मात्र या मृतदेहावरील केस व भुवया नष्ट करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निलिमाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी जिल्हा नाभिक महासंघाकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निलिमा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दापोली येथे कार्यरत होती. शनिवारी ती दापोलीतून ओमळीला जाण्यास निघाली होती. मंगळवारी दुपारी 12:30 वाजता दाभोळखाडीत तिचा मृतदेह आढळला. शनिवारी ती दापोली व खेड बस स्थानकात सीसीटीव्हीत दिसत आहे. खेडमधून चिपळूणला जाण्यासाठी गाडीत बसल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा मोबाईल बंद होता. तपास यंत्रणेला 29 जुलै रोजी रात्री 12.05 ला अंजनी रेल्वे स्टेशन वर मोबाईल लोकेशन दाखवत होते. हे संशयास्पद आहे.
मृतदेहाच्या डोक्यावरील संपूर्ण केस नष्ट झालेले होते. डोळ्यावरील भुवया काढण्यात आल्या होत्या. हे मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून केलेले असू शकते. त्यामुळे यामध्ये घातपाताचा संशय असून याचा तपास वरिष्ठ यंत्रणेमार्फत होणे आवश्यक आहे. 12 ऑगस्ट पर्यंत योग्य न्याय मिळाला नाही तर जिल्हा नाभिक समाज बांधव 15 ऑगस्ट 23 रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनात जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, दापोली तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, चिपळूण तालुकाध्यक्ष संजय जाधव, खेड तालुकाध्यक्ष शामसुंदर दळवी, गुहागर तालुकाध्यक्ष तसेच मंगेश शिंदे यांच्या सह्या आहेत.