संगमेश्वर / प्रतिनिधी:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, आदी बहुजन महापुरुषांबद्दल बदनामीकारक जाहीर वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आजच्या तुरळ येथील जाहीर सभेत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की राष्ट्रपुरुषांच्या विरोधात असे बेताल वक्तव्य केल्यामुळे धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण होऊन सुसंस्कृत महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचे वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे असताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक न करता मोकाट सोडत उद्या तीन ऑगस्ट रोजी चिपळूणच्या दौऱ्यावर येण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येतेच कशी? असं संशय व्यक्त करत राज्यकर्त्यांच्या सहमतानेच ही महापुरुषांची बदनामी चालली नाही ना ? असे भायजे यांनी व्यक्त करत सरकारवरही ताशेरे ओढले.
तुरळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेला जि.प चे माजी शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर, माजी सभापती कृष्णाजी हरेकर, दिलीप पेंढारी. जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष दत्ताराम लांबे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांगणे, तूरळचे सरपंच श्री सहदेव सुवरे ,आरवलीचे सरपंच निलेश भुवड, राजवाडीचे सरपंच संतोष भडवळकर, शेनवड्याचे सरपंच दत्ताराम लाखन, कडवईचे विजय कुळेकर, धामापूरचे सुशील भायजे, असुर्डेचे उपसरपंच धावडे गुरुजी, बुरुंबाडचे भाई कुळे, अनिल बोले, रमेश डिके,यशवंत चांदे आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.