रत्नागिरी:-कोकणात गणेशोत्सव चाकरमान्यांचा मोठा पतिसाद एसटीला लाभत असून गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आह़े चाकरमान्यांचा वाढता ओघ लक्षात घेता मुंबईतून रत्नागिरीसाठी 2 हजार 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े, तर परतीसाठी 1550 गाड्या सोडण्यात येणार आहेत़, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रत्नागिरी विभागातील 9 आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडुप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, ग्रुप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाईल ऍपव्दारे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने 15 सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. 23 पासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. परतीसाठी 279 गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. दापोली आगारातून 200, खेड 150, चिपळूण 230, गुहागर 260, देवरूख 180, रत्नागिरी 150, लांजा 130, राजापूर 170, मंडणगड आगारातून 80 मिळून एकूण 1550 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांनी ग्रुप बुकींग केले तर त्यांना गावातून थेट बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी गावागावातील सरंपचांशी संपर्क साधून ग्रुप बुकींग सुविधेबद्दल माहिती दिली जाणार आहे. दापोली आगारातून 58, खेड 44, चिपळूण 57, गुहागर 26, देवरूख 15, रत्नागिरी 15, रत्नागिरी 20, लांजा 8, राजापूर 37, मंडणगड आगारातून 14 मिळून विभागातून एकूण 279 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध एसटीच्या जादा गाड्यांच्या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.