खेड/इक्बाल जमादार:-पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होताच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खाडीतील कोलंबी आणि बोंबिल यांची मोठ्या प्रमाणावर मासळी बाजारात आवक झाली असून त्यांचा वाटा शंभर रुपयांना मिळत असल्याने येथील मांसाहारी खवय्यांना चांगलीच लॉटरी लागली आहे.
जिल्ह्यातील खाडीतील लाल कोलंबी आणि ताजे बोंबिल दापोली मच्छी मार्केट सकाळीच दाखल होत असल्याने दापोलीकर खरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहेत. बोंबिल आणि कोलंबीचा वाटा शंभर रुपयांना मिळत आहे. १ ऑगस्टचा मुहूर्त काढून काही दालदी जाळीच्या मोठ्या नौका मंगळवारी मासेमारीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. मासेमारीस जाणाऱ्या मच्छीमारांनी नौकेत धान्य, पाणी, बर्फ, डिझेल आणि आवश्यक साहित्य भरून सज्जता केल्याचे दिसून आले. वादळी वातावरण असल्याने नौका खोल समुद्रात मासेमारीस जातील असे तूर्त दिसत नाही; परंतु पहिली मच्छीची पलटी मिळविण्यासाठीचा प्रयत्न राहील, असे काही मच्छीमारांनी सांगितले.