चिपळूण:-दाभोळ खाडीत गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे खाडी परिसरातील मच्छीमार धास्तावले आहेत. यासंदर्भात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क करून माहिती दिली असता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नुकसानीचा पंचनामा करत मृत मासे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर मासेमारी हेच तेथील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सद्यस्थितीत या खाडीत अनेक प्रकारची मासळी मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र असे असताना रविवारपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. यासंदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत माहिती दिली आहे.