दापोली:-दापोलीमधून शनिवारी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र ही आत्महत्या की घातपात याचा तपास लावण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे.
दापोलीमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत ओमळी – चिपळूण येथील 20 वर्षीय निलिमा चव्हाण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली होती. शनिवारी संध्याकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली व ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे वडील सुधाकर चव्हाण यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली होती.
या फिर्यादीनुसार तपास केला असता ती शनिवारी सकाळी दापोली बस स्थानकात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले. दापोलीतून खेड येथे ती बसने गेली. खेड येथे देखील ती बस स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली. मात्र तिथून ती पुढे कोठे गेली याचा तपास लागलेला नव्हता.
मंगळवारी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आला. मृतदेह पाण्यात जास्त वेळ राहिलेला असल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र निलिमाच्या हातात असलेल्या अंगठीवरून तिची ओळख पटवणे शक्य झाले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
निलिमा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती दापोलीमधून खेडपर्यंतचा प्रवास करून गेल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. पण ती खेडमध्ये का गेली, ती खेडमधून पुढे गेली होती का असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.