दापोली:-दापोली-जालगाव रोडवर वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या बांधकाम विभाग प्रशासनाच्या लक्षात कशी येत नाही, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
दाभोळ भागाकडून दापोलीकडे येणाऱ्या जालगाव आणि दापोलीच्या हद्दीतील मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे कोणता खड्डा वाचवायचा आणि कोणत्या खड्डयातून वाहन चालवायचे याचीच कसरत करत आपल्या ताब्यातील वाहने वाहनचालकांना सध्या चालवावी लागत आहेत. या मार्गावरूनच जालगाव येथे आपल्या निवासाकडे आणि निवासाकडून परत कार्यालयाकडे शेकडो अधिकारी, कर्मचारी प्रवास करतात तसेच या खड्ड्यातील मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांनाही या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी येथील प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे.