सिंधुदुर्ग:- जिल्ह्यातील आंबोली हे ठिकाण जैवविविधतेच्या दृष्टिने अतिशय संवेदनशील क्षेत्र समजले जाते. बरेचसे प्रदेशनिष्ठ कीटक, कोळी, बेडूक, साप, पक्षी, प्राणी आणि वनस्पती आंबोलीतच पाहायला मिळतात.
या दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ जैवविविधतेला आणि त्यांच्या अधिवासाला जवळून पाहण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची संधी महाराष्ट्रातील सिंधुदुर्गसह रत्नागिरी, मुंबई, पुणे, गडचिरोली व गोव्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते ‘जैवविविधता कार्यशाळे’चे. या कार्यशाळेतून मुलांना मिळाली. मलबार पिट वायपर, ग्रीन वाइन स्नेक, मलबार ग्लायडिंग फ्रॉग, आंबोली टायगर टोड, नॅरो फ्रॉग माऊथ, मार्बल फ्रॉग, कॅसलरॉक नाईट फ्रॉग अश्या आंबोलीचे गौरव समजल्या जाणाऱ्या बेडकांना आणि सापांना जवळून बघण्याची संधी सहभागी विद्यार्थ्यांना मिळाली.
आंबोली म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दाट धुकं, मोठं मोठे डोंगर, खळखळ वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि याच सर्व गोष्टींच पर्यटकांना आकर्षण असतं आणि दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत देशभरातील पर्यटकांची जत्रा भरते; परंतु आंबोलीमध्ये धबधब्यांव्यतिरिक्त खूप काही बघण्यासारखं आहे जे फक्त आंबोलीमध्येच बघायला मिळतं. सिंधुदुर्गातील निसर्ग आणि जैवविविधतेवर काम करणाऱ्या माय वे जर्नी ऑर्गनायझेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि युरेका सायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली-चौकुळ परिसरात दि. 28 ते 30 जुलैदरम्यान निसर्गशाळा या उपक्रमाअंतर्गत 3 दिवसीय जैवविविधता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत गडचिरोली, मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि अगदी गोव्यातून जवळपास 30 शालेय आणि महाविद्यालयीन मुलांनी सहभाग घेतला होता. ही कार्यशाळा फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी माय वे जर्नी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश कोळी आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी पक्षीमित्र प्रवीण सावंत, किटक अभ्यासक अक्षय दळवी, बेडूक अभ्यासक गुरुनाथ कदम, कोळी अभ्यासक तेजस सावंत, मयुरी चव्हाण, फैयाज तालिकोट, भुपेश केरकर, गंधार मराठे, युरेका सायन्स क्लब च्या सुषमा केणी मॅडम आणि वाळके मॅडम, चौकुळ चे लोकल गाईड मिलिंद गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना मिळाले. या कार्यशाळेत 15 प्रकारचे बेडूक, 2 प्रकारचे साप, 6प्रकारचे मासे, 4 प्रकारचे खेकडे, 25 प्रकारचे कोळी आणि जवळपास 40 हून अधिक प्रकारचे कीटक पाहण्याची व त्यांच्या अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. या कार्यशाळेसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वनविभाग सावंतवाडीने मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे माय वे जर्नी ऑर्गनायझेशन यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
निसर्ग अनुभवण्याची संधी
माय वे जर्नी ऑर्गनायझेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि युरेका सायन्स क्लब या संस्था गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गातील जैवविविधतेवर विविध प्रकारच्या कार्यशाळा घेऊन मुलांची निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न निसर्गशाळा या उपक्रमाअंतर्गत करत आहे. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता निर्सगात नेऊन निसर्ग अनुभवण्याची संधी अशाप्रकारच्या कार्यशाळेतून मिळत असते.
माय वे जर्नी ऑर्गनायझेशन ही संस्था अश्याप्रकारचे काम करणारी सिंधुदुर्गातील एकमेव संस्था असून या संस्थेला अश्या प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल एथिकल नेचर ट्रेल ऑर्गनायझर या विभागामध्ये स्पेसिज अँड हॅबीटॅट या पुरस्काराने वनमंत्री यांच्यामार्फत गौरवण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल मार्गदर्शन करून जास्तीत जास्त निसर्ग अभ्यासक विद्यार्थी तयार करून निसर्ग पर्यटन आणि जैवविविधता संवर्धनाचे काम या संस्था अविरतपणे करत आहेत.