पुन्हा एकदा हाताची स्वच्छता अन् गर्दीत न जाण्याचा सल्ला
पुणे:-राज्यात पुणे, सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये डोळे येणाऱ्या रूग्णांची विशेषत: चिमुकल्यांची संख्या वाढू लागली आहे. ॲडिनो विषाणूंमुळे डोळे येतात. पण, आता इंटेरो व्हायरसद्वारे ही साथ झपाट्याने पसरत आहे.
सध्या राज्यात डोळे आलेले पाच हजारांहून अधिक रुग्ण आहेत. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे गोचिड तापाचेही रुग्ण आढळत आहेत. त्यावर नागरिकांना पुन्हा एकदा हाताची स्वच्छता अन् गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
ॲडिनो विषाणूंमुळे डोळे येतात. त्यामुळे डोळ्याला चिपड येतात, ते कचकच करतात आणि डोळ्यांतून पाणी येते. एकमेकांच्या संपर्कात आल्यावर लगेचच समोरील व्यक्तीचेही डोळे येतात. विषाणुजन्य संसर्गामुळे हा आजार बळावत आहे.
डोळे कचकच करतात आणि त्यामुळे डोळे चोळले की ते लाल होतात व सूज येते. एक डोळा आला की दुसऱ्यालाही तसे होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी इतरत्र कोणत्याही वस्तूला हात लावू नये. डोळे आलेले तीन-चार दिवसांत बरे होतात.
पण, त्यासाठी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे आवश्यक आहे. डोळे आलेल्यांनी डोळ्याला हात लावणे टाळावे, गर्दीत जाणे टाळावे व हाताची स्वच्छता ठेवावी आणि डोळ्याला चष्मा लावावा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
गावठी उपचार नकोत
डोळे आल्यावर खेड्यापाड्यावरील लोक सुती कापडाला हळद लावून डोळ्याला लावायला सांगतात. त्यामुळे डोळ्याची जळजळ बंद होऊन लवकर बरा होईल, असे सांगितले जाते.
पण, डोळे आल्यावर नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध दुकानांमधून किंवा शासकीय रुग्णालयातून औषधे घ्यावीत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावठी उपचार केल्यास नेत्रपटलाला इजा होऊन डोळा खराब होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे म्हणतात…
गोचिड ताप हा विशिष्ट किडा चावल्याने होतो. उष्ण व दमट वातावरण त्या किड्याला पोषक ठरते. तो किडा चावल्यावर ६ ते २१ दिवसांत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडी, ताप येणे,
डोकेदुखी, अंगावर काळ्या रंगाचे मोठे पुरळ येऊन त्याठिकाणी काळ्या रंगाचा डाग पडतो. तसेच खोकलाही येतो. अशी लक्षणे असलेल्यांनी ताप अंगावर न काढता तत्काळ जवळील रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे.