राजापूर:-रोजच्या दैनंदिन कामातून थोडी उसंत काढत विरंगुळा आणि मनोरंजन यासाठी ग्रामिण भागातील शेकडो महिला सध्या गाजत असलेला चित्रपट पाहायला राजापूरात.
चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी महिला संघाच्या माध्यमातून राजापूरच्या पश्चिम भागातील स्वयं सहायता महिला बचत गटांच्या 270 महिला बाईपण भारी देवा चित्रपट पहायला दाखल झाल्या होत्या आडिवरे,कालिका वाडी, कोंबे, नवेदर,कोंडसर, मोगरे, भालावली,नाटे, धाउलवल्ली, जैतापूर, कुवेशी, तुळसुंदे, अणसुरे, वाकी आदी गावातून या महिला सहभागी झाल्या होत्या.
वेगवेगळ्या गावातून महिलांना राजापुरात ने आण करण्यासाठी राजापूर आगारातून सहा स्पेशल एस. टी. गाड्यांचे बुकिंग करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या महिला स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी साडेनऊच्या सुमारास वेगवेगळ्या गावातून निघालेल्या या एसटी गाड्या राजापूर शहरात पोहोचल्यावर राजापुरातील प्रसिद्ध वकिल एडवोकेट शशिकांत सुतार आणि पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांच्याकडून ग्रामिण भागातून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमात ग्रामीण भागातील तरुण, ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. अनेकांनी तर पहिल्यांदाच चित्रपटगृह पाहिले असल्याचे सांगितले.
नेहमीच्या दैनंदिन कामातून उसंत काढत केवळ विरंगुळा आणि मनोरंजन व्हावे सर्वांना आनंद प्राप्त व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी त्रिवेणी संघाच्या सर्व संघ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.