आमदार राजन साळवी,तहसीलदार अमृता साबळे यांनी केली पाहणी
देवरुख/प्रतिनिधी:-तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगराचा भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे २ घरांना धोका निर्माण झाल्याने कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खचलेल्या भागाची आमदार राजन साळवी व तहसिलदार अमृता साबळे यांनी पाहणी केली.
चाफवली भटाचा कोंड, आडवी पेणी, या वाड्यातील डोंगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या. या वर्षीही अतीवृष्टीमुळे पुन्हा भेगा पडल्या आहेत.भटाच्या कोंडाकडे जाणारा रस्ताही दुभंगला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळेच डोंगराला भेगा गेल्याचे म्हटले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास डोंगर सरकू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
चाफवली येथील खचलेला डोंगर आणि पडलेल्या भेगा यांची राजापूर लांजा साखरपा विभागाचे आमदार राजन साळवी यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी सभापती जया माने, संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे, नायब तहसीलदार सुदेश गोताड, गटविकास अधिकारी भरत चौगले, मंडळ अधिकारी भोजे, यादव, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक माईन, शिवसेनेचे विभाग प्रमुख मनोहर सुकम, माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे, उपविभाग प्रमुख प्रकाश चाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापू शिंदे, शेखर आकटे, चाफवली पोलीस पाटील विजय चाळके, उपसरपंच विजय घुमे, हरीश कांबळे, नितीन कांबळे, गणपत केदारी उपस्थित होते.