संगमेश्वर/प्रतिनिधी:- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता लढा आहे तो स्वकियांच्या मनमानी कारभार विरोधात. अंत्रवली येथे थेट ग्रामस्थांनीच रत्यावर उतरून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली, ग्रामसेवकाच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात ग्रामस्थांच्या वतीने येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या ग्रामसेवकाची त्वरीत बदली करावी, ही या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे असे, आंदोलनाचे नेतृत्व करणारे पत्रकार संदेश सुरेश जिमन यांनी सांगितले
अंत्रवली, मालपवाडी या गावाच्या वाडीची ग्रामस्थांची गरज नसतानाही तब्बल ४ लाख २२ हजार खर्च करून विनाकारण एक साकव बांधला. त्यातून ग्रामस्थांचे, प्रशासनाचे आणि शासनाचे निधीचे पैसे उधळण्यात आले. त्याचप्रमाणे १४वा आणि १५ वा वित्त आयोग तसेच स्थानिक निधी याचा वापर कशा प्रकारे केला गेला आहे, याची माहिती सांगणारा फलक तकलादू पद्धतीने मातील रोवून उभा केला आहे. तो कधीही तुटू शकतो. त्यामुळे अपघात होऊ शकतो. त्या फलकासाठी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण पातळीवर फलकांबाबत अतिशय स्पष्ट असे नियम केलेले असूनही संबंधित ग्रामसेवकाने मनमानी केलेली दिसते.
संबंधित ग्रामसेवक ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मागण्या, विचार, प्रश्न, समस्या यांना तकलादू उत्तरे देतात. ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य उत्तरे, समाधान मिळत नाही. ग्रामसेवक गावातील काही पुढा-यांचेच काम करत आहे, असा संशय ग्रामस्थ बोलून दाखवतात. त्यामुळे राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या या ग्रामसेवकाला ग्रामस्थांच्या विकासाची कामे दिसत नाहीत. याबाबत संदेश जिमन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी १२ जून २०२३ रोजी उपोषण आंदोलन छेडले होते. त्यावेळी ग्रामसेवकाला जाब विचारला होता. त्याचे केवळ लेखी आश्वासन देऊन संबंधित ग्रामसेवकाने वेळ मारून नेली होती. खूप दिवसांनी आंदोलनकर्त्यांना निधीचा विनियोग कसा केला याची माहिती सांगणाऱ्या फलकाचे फोटो पाठविण्यात आले. पण 14 वा,15 वा वित्त आयोग आणि स्थानिक निधी याची यादी दिली नाही. त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामपातळीवर झालेल्या प्रत्येक कामाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ग्रामसेवक हे गावाच्या, ग्रामस्थांच्या, स्थानिकांच्या, भूमिपुत्रांच्या सेवेसाठी शासनाने नियुक्त केलेले असताना ते तथाकथित स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या सेवेसाठी नियुक्त केल्यासारखे वागतात, असा संतप्त आरोप ग्रामस्थ करत आहेत. आम्हाला गावात राजकारण विरहीत समाजकारण आणि विकास करायचा आहे. आम्हाला आमचे म्हणजे भयरहीत वातावरणात मांडता आले पाहिजे. त्यात अशा भेदभाव करणाऱ्या ग्रामसेवकाची गरज नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणूनच या ग्रामसेवकाची त्वरीत बदली शासनाने करावी, ही त्यांनी मागणी केली. त्यासाठी पत्रकार संदेश जिमन यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ येत्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, अंत्रवली येथे सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
या आंदोलनाची पूर्वकल्पना शासकीय प्रशासकीय अधिकारी,मुख्यमंत्री,प्रसार माध्यमे आणि संबंधित यंत्रणांना देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता उपक्रमात कोकणातील स्थानिकांवर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून अजूनही ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत कसे डावलले जात आहे, हे सर्वतोपरी व्हावे हा या आंदोलनाचा हेतू आहे. एकीकडे ग्रामपातळीवर विकासाची कामे होत असताना, काही व्यक्ती अधिकारपदावर बसून मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या बेफिकीर कार्यपद्धतीची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणात संबंधितांचा भ्रष्टाचार उघड केला जाईल, ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शन घडेल, ग्रामस्थांना सोयीसुविधा पुरविण्याबाबत, त्यांचा निधी योग्य प्रकारे वापरण्याबाबत आणि त्यांच्या हितासाठी समाजकार्य करण्याबाबत संदेश दिला जाईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांच्या वतीने पत्रकार संदेश जिमन यांनी दिला आहे.