नवी मुंबई:-देशभरातील ‘एक्स्प्रेस वे’ आणि राष्ट्रीय महामार्गांभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले ‘बाहुबली’ कुंपण उभारले जाणार असून याचा पहिला प्रकल्प छत्तीसगडमध्ये सुरू केला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिली.
पोलादाला इकोफ्रेंडली पर्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असून या प्रकल्पाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील मोठा लाभ होईल. आदिवासी आणि ग्रामीण भागांतील जनतेला याचा मोठा लाभ होणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
अशाप्रकारच्या बाहुबली कुंपणाचा पहिल्यांदाच वापर होत असून ते इको-फ्रेंडली देखील आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्वप्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या असून पोलादाच्याऐवजी आता त्याचा वापर होणार आहे. या प्रकल्पासाठी संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळविण्यात आल्या असल्याचेही गडकरी यांनी शून्य प्रहरामध्ये बोलताना नमूद केले.
बांबूची उपयुक्त्तता मोठी
मध्यंतरी महामार्गांवर जनावरे आल्याने अनेक अपघात झाले होते, त्या पार्श्वभूमीवर या अपघातांना रोखण्यासाठी महामार्गांभोवती लाकडी कुंपण उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली होती. ”आसाममध्ये बांबूपासून इथेनॉलबरोबरच लोणची आणि कापडदेखील तयार केले जाते. चीनमध्ये बांबूची मोठी अर्थव्यवस्था असून आपल्या देशामध्येही त्याची व्याप्ती खूप मोठी आहे,” असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
आदिवासींना होणार लाभ
या मोहिमेच्या अनुषंगाने पहिला पायलट प्रोजेक्ट हा छत्तीसगडमध्ये राबविला जाणार असून तो जर यशस्वी झाला तर सर्वत्र स्टीलऐवजी बांबूचाच वापर करण्यात येईल. हा पर्यावरणपूरक प्रकल्प असून त्यामुळे आदिवासींनादेखील रोजगार मिळणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
बांबू क्षेत्राची व्याप्ती…
१ कोटी ३९ लाख हेक्टर
बांबू लागवडीचे क्षेत्र १३६ प्रजातींची
देशामध्ये लागवड १२५
स्वदेशी प्रजाती ११
परकी प्रजाती २८ हजार कोटी
देशातील बांबूची बाजारपेठ
३० हजार कोटी भविष्यातील अपेक्षित उलाढाल