रायगड लोकसभेवरही उमेदवारीचा दावा
दापोली:-आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघांबरोबरच नवे मतदार संघ निर्माण करण्याच्यादृष्टीनेही काँग्रेस प्रयत्न करेल.
विशेषतः दापोली आणि राजापूर विधानसभा मतदार संघ आणि रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेस आपले उमेदवार उभे करेल, असे माजी खासदार हूसेन दलवाई यांनी सांगितले.
दापोली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभेला दापोली, खेड आणि मंडणगड येथील बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार दलवाई म्हणाले, भारतीय परंपरा वाचवण्याचे फार मोठे आव्हान आहे. देशाच्या एकात्मतेत फूट पाडणाऱ्या शक्तींना देशापेक्षा धर्म मोठा करण्याची इच्छा आहे. केवळ सत्तेसाठी एखादा पक्ष कोणत्या आणि किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचं एकमेव उदाहरण भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्षांत दाखवून दिलं आहे. स्त्रियांवरील एवढ्या पराकोटीच्या अत्याचाराबाबतही पंतप्रधान किंवा भाजपाच्या नेत्यांचे मौन हेच, हे सरकार देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सपशेल अपयशी असल्याचेच लक्षण आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी हाच संदेश संपूर्ण जगभरात पोहोचवला आहे.
दापोली दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार दलवाई यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट घेतली. दापोलीतील आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल आणि वराडकर-बेलोसे महाविद्यालय या प्रसिद्ध आणि जुन्या शिक्षणसंस्थेच्या संचालक मंडळींसोबत प्रदीर्घ चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले. या वेळी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सुर्वे, जिल्हा प्रवक्ता इब्राहीम दलवाई, दापोली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते, मंडणगड तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, डॉ. विष्णू दांडेकर, अॅड. विकास मेहता आणि काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संतोष शिर्के आदींनी विचार मांडले.
मतदारांची मोट बांधण्यात काँग्रेस यशस्वी
भाजपच्या कारभाराला वैतागलेल्यांमध्ये विचारवंत, साहित्यिक, कलाकार, वैज्ञानिक,व्यापारी शेतकरी, मजूर, नोकरदारवर्ग आणि समाजसेवकांची फार मोठी संख्या आहे. धार्मिक अवडंबर, हिंदू-मुस्लिम दुफळी आणि देशातील बहुजन वर्गात निर्माण झालेली पराकोटीची अस्वस्थता हीच भाजपच्या मागील दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे देणं आहे. महागाईने पिचलेल्या नागरिकांचे प्रश्न न सोडवू पाहणाऱ्या भाजपला देशातील धर्मनिरपेक्ष मतदार धडा शिकवतील. त्या मतदारांची मोट बांधण्यात काँग्रेस यशस्वी होत आहे, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला.