राजापूर:- जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले आहे. राजापूरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूरातील कोदवली नद्या इशारा पातळीच्यावर वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यात हरचेरी येथेही रस्त्यावर पाणी आले आहे.
आज पुन्हा एकदा अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे राजापूर शहर जलमय झाले आहे. आज सकाळी 11 वाजता राजापूर शहरातील पाणी जवाहर चौकामध्ये शिरले. शहरातील चिंचबांध परिसर, वरची पेठ रस्ता, शिवाजीपथ, बंदर धक्का परिसर, मुळशीनाका परिसरात पाणी शिरले. राजापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.
जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 988 मिमी आणि सरासरी 109.78 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 106 मिमी, दापोली 146 मिमी. खेड 92 मिमी, गुहागर 112 मिमी, चिपळूण 173 मिमी, संगमेश्वर 102 मिमी, रत्नागिरी 85 मिमी, लांजा 88 मिमी, राजापूर 84 मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरीता अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांना आज सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला.