लांजा:- तालुक्यातील खोरनिनको धरण धबधब्यावरील पर्यटनास दोन महिने बंदी घालण्याचे आदेश तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशामुळे असंख्य हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
मुचकुंदी नदीवरील खोरनिनको येथील धरण पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. असंख्य पर्यटक पावसाळ्यात या धरणावर जलक्रीडेसाठी जात असतात. मात्र पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.