मंडणगड:-ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्टने मंडणगड तालुक्यात एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पर्यावरण संवर्धन आणि रोजगार असा दुहेरी उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मंडणगड तालुक्यातील वडवली गाव परिसरात ४० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक भावेश कारेकर यांनी दिली.
ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वडवली गावातील शेतकरी स्वप्नील आग्रे यांच्या २ एकर क्षेत्रावर बांबू रोपांची लागवड करण्यात आली. ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक भावेश कारेकर आणि गावातील इतर शेतकरी लागवडीच्या वेळेस हजर होते. गेल्या वर्षीपासून ट्रस्टच्या माध्यमातून वडवली गावात ४० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमातून गावातील बऱ्याच लोकांना मजुरीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. येत्या काळात बांबू लागवडीच्या वाढत्या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील इतर लोकांना नवीन रोजगाराची संधी मिळणार असल्याचे कारेकर म्हणाले.
शेती क्षेत्रामध्ये बांबू लागवड हा एक प्रमुख जोडव्यवसाय आहे. शेतकरी बांबू लागवडीमुळे ग्रामीण विकास, आर्थिक व आरोग्यदायी वृत्तींची उत्पन्नता वाढवण्यात मदत होते. बांबू लागवडीमुळे जल, वायू, आणि जमिनीवरील प्रदूषण कमी होते. त्यामुळे पर्यावरणाची संरक्षणाची प्रक्रिया सुधारते. बांबूच्या वृद्धीमध्ये जलसंचयन अत्यंत चांगले होते. तसेच जमिनीची धूप धांबते. त्यामुळे आसपास झालेल्या सार्वजनिक स्रोतांवर चांगला परिणाम होतो. परिसरात करण्यात आलेल्या लागवडीचा उपयोग गावाला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.