दापोली:-चंद्रनगर येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी शमिका नयनेश मुलूख हिने चांद्रयान-3 ची प्रतिकृती निर्माण केली आहे.
येत्या काही दिवसांत हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असलेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमाचे संपूर्ण जगभरासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. भारतातील कोट्यवधी जनतेने या थेट प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. भारतातील सर्व शाळा- महाविद्यालयांतून सर्व विद्यार्थ्यांनी या थेट प्रक्षेपणाचा आस्वाद घेतला. दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणातून हा कार्यक्रम पाहिला. मुख्याध्यापिका अर्चना सावंत, विषय शिक्षक बाबू घाडीगावकर, मानसी सावंत, मनोज वेदक या शिक्षकांनीही चांद्रयान-3, त्याची माहिती, उद्देश, इस्रो या संस्थेच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. त्यातून प्रेरणा घेत या शाळेतील सातवीतील विद्यार्थिनी कु. शमिका नयनेश मुलूख हिने आपत्कालीन अतिवृष्टी सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीत घरीच चांद्रयान-3 ची अगदी हुबेहुब प्रतिकृती तयार केली. कागद, पुठ्ठा, गोंद, स्केचपेन, कात्री आदी उपलब्ध साहित्याचा वापर करून तिने ही प्रतिकृती बनविली आहे.
आपत्कालीन सुट्टीनंतर सोमवारी शाळेत आल्यावर तिने ही प्रतिकृती वर्गशिक्षक बाबू घाडीगावकर यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनीही शमिका मुलूखचे कौतुक केले. विज्ञान विषय, तंत्रज्ञान, मूलभूत संकल्पना, संशोधन आणि प्रयोगांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी अशी स्वयंनिर्मिती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपेश बैकर यांनी व्यक्त केले.