मुंबई:-राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या चालू अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यावेळी किमान सहा राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.
विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांचा अधिक दबाव आहे. शिंदे यांनी बंड करताना त्यांच्यासोबत सर्वात आधी गेलेल्या काही आमदारांना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. त्यांना विस्तारात प्राधान्य दिले जाईल, असे मानले जाते. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दहापैकी एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते. राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यातील प्रत्येकी दहा भाजप आणि शिंदे गटाचे, तर नऊ राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आहेत.
मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचे मंत्रिमंडळ असू शकते. याचा अर्थ १४ मंत्रिपदे अद्याप रिक्त आहेत. त्यापैकी भाजपला सात आणि शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. अधिवेशनानंतर विस्तार होईल असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिले होते.
पवार गटाशी चर्चा
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील काही नेत्यांना गळाशी लावण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून केले जात आहेत. त्यांच्यापैकी एक दोघांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले; पण भाजपच्या महिला आमदार वंचित राहिल्या यावरून कमालीची अस्वस्थता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये पूर्वीसारखे ऐक्य कायम राहावे, असेही प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू आहेत; पण त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. म्हणून काही नेत्यांना आपल्याकडे ओढण्यावर भर दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तरी त्यांनी शरद पवार गटातील नेत्यांशी बोलणे सुरूच ठेवले आहे.
भाजपकडून दोन महिलांना संधी?
भाजपकडून मंत्रिपदे देताना दोन महिलांना संधी दिली जाऊ शकते. तसेच मुंबई, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाला प्रामुख्याने सामावून घेतले जाऊ शकते. अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही याच भागातून मंत्रिपदे दिली तर अन्य भागाचा विचार भाजपकडून केला जाईल. १५ ऑगस्टपर्यंत विस्तार अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर ३० ऑगस्टपूर्वी तरी विस्तार नक्कीच होईल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.