दाभोळ:-आठवडाभर दाभोळमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या मोठ्या आपत्तीच्या घटनेत वाढ झाली असून त्यात दाभोळ भंडारवाड्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री हनुमान देवस्थानची एका बाजूची भिंत कोसळून सुमारे 3 लाख रुपयांचे देवस्थानचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील दाभोळ या ऐतिहासिक बंदराच्या गावातील भंडार वाडा येथे श्री स्वयंभू हनुमान देवस्थान आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. त्यामुळे या देवस्थानावर अपंरपार लोकांची श्रद्धा आहे. अशा या श्री देव हनुमानाच्या देवळात हनुमान जयंती श्रावणी शनिवार तसेच वर्षभरातील विविध धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. देव दर्शनासाठी कायमच भक्तांची रिघ असलेल्या या देवळाच्या एका बाजूची कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अंदाजे 30 फूट उंचीची आणि 20 फूट लांबीची पक्की बांधी कोसळून त्यात 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी नशीब कोणीच देवळात नव्हते, मात्र कोसळलेल्या भिंतीचा हादरा बसून देवळाचा एक खांब कमकुवत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.
या घटनेची माहिती श्री हनुमान देवस्थान कमिटी दाभोळ भंडारवाडातर्फे महसुल प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत मंडल निरीक्षक तसेच दाभोळ सजाचे तलाठी बोरसा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करत घटनेच्या नुकसानीचा पंचनामा केला यावेळी पोलीस पाटील विनायक कुडाळकर, श्री हनुमान देवस्थान दाभोळ भंडारवाडा देवस्थानचे अध्यक्ष गजनान तोडणकर, सेक्रेटरी दिलिप तवसाळकर, ग्राम पंचायत सदस्य आणि देवस्थानचे कमिटी सदस्य समित भाटकर आदी उपस्थित होते.