रत्नागिरी:-अंमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.
एनसीओआरडी अर्थात अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निरीक्षक जनार्दन परबकर, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, मत्स्योत्पादनाचे सहाय्यक आयुक्त अभयसिंह इनामदार, जिल्हा बंदर अधिकारी वाय. आर. कुलकर्णी, चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, कस्टमचे अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर आदी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक करुन पोलीस निरीक्षक भातकर यांनी विषय वाचन करुन आढावा दिला. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, पोलीस उपअधीक्षक , उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अंमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अंमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीबाबत दक्ष रहावे. तशी माहिती मिळताच पोलीसांच्या सहाय्याने कारवाई करावी. नशामुक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी आणि शाळा, महाविद्यालयाकडून जनजागृती करावी.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी ही जनजागृती व कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. या बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.