गुहागर – तालुक्यात शनिवारी (ता. २२) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. साखरी बुद्रुक परिसराला पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसला. या गावातील एक महिला व दोन मुले घरावरील पत्रे पडून जखमी झाली.
तालुक्यातील १४ घरांचे सुमारे ६ लाख ५७ हजार ४१० रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
शनिवारी (ता.२२) रात्रीपासूनच गुहागर तालुक्यात सर्वत्र वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यात तीन ठिकाणी विजेचे खांब पडले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. साखरी बुद्रुक परिसरात वादळ झाले. या वादळामुळे विकास पंढरीनाथ मोहिते यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर कोसळले.
खेडमध्ये मुसळधार; दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प, जगबुडी, नारिंगी पात्राबाहेर
त्यावेळी सौ. प्राची मोहिते व त्यांची दोन लहान मुले घरात होती. पत्रे व अन्य साहित्य अंगावर पडून आईसह दोन्ही मुले जखमी झाली. तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिघांची प्रकृती उत्तम असल्याने संध्याकाळी त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड यांनी सांगितले.
दापोलीत मुसळधारेने जनजीवन विस्कळित, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले; आपत्कालीन पथक सज्ज
या वादळात साखरी बुद्रुकमधील हरिश्चंद्र नागे यांच्या गोठ्याचे ८ हजार ९० रुपयांचे नुकसान झाले. दीपाली काताळकर यांच्या घराचे ५ हजार ३७० रुपये, नंदा देवजी मोहिते यांच्या घराचे १ लाख ३ हजार ८०० रुपये,
शारदा शरद मोहिते यांच्या घराचे १ लाख ७०० रुपये, प्रकाश तुकाराम मोहिते यांच्या घराचे ९८ हजार ३०० रुपये, कांचनी विजय मोहिते यांच्या घराचे ८ हजार रुपये, राजेश पंढरीनाथ मोहिते यांच्या घराचे ७६ हजार रुपये, मारुती धोंडू मोहिते यांच्या घराचे १० हजाराचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील निगुंडळ बौद्धवाडीमध्ये विद्युत वाहिनी तारांवर झाडाची फांदी पडून दोन खांब तुटले. यामध्ये बौद्धवाडीतील आनंद पवार यांच्या घराचे नुकसान झाले आहे. आंबेरे खुर्द पंचशील नगर येथेही दोन विजेचे खांब पडले. कोंडकारुळ येथील विकेश रवींद्र ढोर्लेकर यांचा घरालगतचा संरक्षक चिरेबंदी बांध पडून अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.
वेळणेश्वर येथील वासंती अप्पा जामसुदकर यांच्या घराची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. पंचनाम्यात २ लाख, २६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. पेवे येथे अरुण विठ्ठल मोहिते यांच्या घराची पडवी पडून सुमारे १६ हजार ५५० रुपयांचे नुकसान झाले.
कोंडकारुळ येथील श्रीमती नलिनी नरेश अडुरकर यांच्या घरावर लगतचा बांध पडून घराचे पूर्णत: नुकसान झाले. हे घर इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधलेले होते. सदरच्या घटनेचा पंचनामा सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात येणार आहे. बंदरवाडी येथील वंदना गजानन पावरी यांच्या घरालगत असलेले झाड उन्मळून पडले. यामध्ये घराचे अंशतः नुकसान झाले आहे.