मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा अफवेचा फोन
मुंबई:- मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी आरडीएक्स घेऊन जात असल्याचा अफवेचा फोन करणाऱयाला मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट-7 ने कांजुरमार्ग येथून अटक केली.
नीलेश पांडे असे त्याचे नाव आहे. पांडेच्या मोटरसायकलला टँकरचा धक्का लागल्याने त्या टँकरचालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
आज पहाटे पोलीस महासंचालक कार्यालयातील नियंत्रण कक्षात फोन आला. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका टँकरमध्ये दोन पाकिस्तानी हे आरडीएक्स घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. त्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली. रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथे नाकाबंदी करून त्या टँकरचालकाला ताब्यात घेतले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्या टँकरची तपासणी केली. त्यात पॉलिथिन बनवण्याचे साहित्य असल्याचे उघड झाले.
अफवेचा फोन करणाऱयाचा क्राईम ब्रँच युनिट-7 शोध घेत होते. वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक जाधव, सावंत, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, बल्लाळ, कदम आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना पांडेची माहिती मिळाली. तो कांजुरमार्ग येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आज सायंकाळी पांडेला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शुक्रवारी रात्री पांडे हा भाईंदर येथील फाऊंटन हॉटेलजवळील टपरीजवळ दारू पित बसला होता. दारू प्यायल्यावर तो ठाण्याच्या दिशेने जात होता. तेव्हा त्याच्या मोटरसायकलला टँकरचा धक्का लागला. त्यावरून पांडे आणि टँकरचालकाचा वाद झाला. पांडेने टँकरचालकाला तो कुठे जाणार, तो कधी पोहचणार असे सांगून मुंबईहून गोव्याला कसे जायचे हे विचारले. टँकरचालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने आज पहाटे फोन केला. जेणेकरून त्या टँकरचालकावर पोलीस कारवाई करतील असे पांडेला वाटले होते. पांडे हा सराईत असून त्याच्याविरोधात कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.