( मंडणगड / प्रतिनिधी )
तालुक्यातील चिंचघर येथे एका व्यक्तीने भर पुरात रात्रभर पुराच्या पाण्यात झाडावर राहून आपला जीव वाचवला. दैव बलवत्तर म्हणून बचावला असे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील भारजा नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराचे पाणी संध्याकाळी चिंचघर मांदिवली पुलावरून वाहू लागले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला. मात्र यादरम्यान रात्री पूल ओलांडत असताना चिंचघरचे ग्रामस्थ महेंद्र पद्रत हे पुलावरून पुराच्या पाण्यातून वाहून गेले. पलीकडे ते सुरक्षित असतील असे मानल्याने कोणीही याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. अशी घटना घडली असेल असे कोणालाही वाटले न्हवते. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महेंद्र यांनी रात्रीच्या अंधारात उंच झाडाच्या फांदीचा आधार घेतला. फांदीवर बसून रात्र काढली. सकाळी चिंचघरचे ग्रामस्थ पूर ओसरल्याचे पाहण्यासाठी असता त्यांना दूर पुराच्या पाण्यात झाडाच्या फांदीवर कोणीतरी बसले असून ते फांदी हलवत मदतीसाठी ओरडत आहेत, असे दिसून आले. ग्रामस्थांनी त्वरित धावाधाव करून दोरीच्या साहाय्याने बचाव कार्याला सुरुवात केली. स्थानिक ग्रामस्थ व दक्षता पथक यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने त्यांचा जीव बचावला.