म्हाडाच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह
रायगड:- महाडजवळील तळीयेतील दरड दुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दुर्घटनाग्रस्त ६६ कुटुंबांना हक्काच्या घरांची प्रतीक्षा असून, सध्या ती कंटेनरमध्ये वास्तव्यास आहेत. म्हाडाने ६६ घरांचे बांधकाम पूर्ण केले असले तरी घरांतील अंतर्गत कामे बाकी आहेत.
शिवाय, दुर्घटनाग्रस्तांनी घरांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, बांधकामातील दोष दूर करेपर्यंत घरांचा ताबा न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
तळीये कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळून ८७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ६६ घरे उद्ध्वस्त झाली. या दुर्घटनेनंतर बाधित ६६ कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी कंटेनरमध्ये करण्यात आले. या कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली. म्हाडाच्या कोकण मंडळाकडे घरांच्या बांधकामाची, तर जिल्हा परिषदेवर पुनर्वसन प्रकल्पातील पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आला.
सुरुवातीला केवळ बाधित कुटुंबांसाठी ६६ घरे बांधण्यात येणार होती. त्यानंतर येथील धोकादायक परिसरातील १९७ घरांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार १४.६४ हेक्टर जागेवर २६३ घरांच्या उभारणीचा प्रकल्प कोकण मंडळाने हाती घेतला. २६३ पैकी पहिल्या टप्प्यात २०० घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या २०० पैकी ६६ घरांचे काम प्राधान्याने पूर्ण करून बाधितांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, ”बाधितांच्या ६६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ही घरे ताब्यात घ्यावीत, याबाबतचे पत्र काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. घरांचा ताबा घेऊन त्यांचे बाधितांना वितरण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे”, असे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ”महाडमध्ये खूप पाऊस पडतो. त्यामुळे घराचा काही भाग वाहून गेला होता. मात्र, कामाचा दर्जा चांगला आहे”, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, घरांचा ताबा कधी देणार याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते इरशाळवाडी दरड दुर्घटनेच्या बचावकार्यात, बाधितांच्या पुनर्वसनाच्या कामात व्यग्र असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
मे महिन्यात सोडत काढून आमच्या घरांची निश्चिती करण्यात आली. मात्र, अजूनही आम्हाला घरांची प्रतीक्षाच आहे. घरांतील अंतर्गत कामे बाकी आहेत. घरांची कामे योग्य प्रकारे पूर्ण झाल्याची खात्री पटत नाही तोपर्यंत घरांचा ताबा घेणार नाही. -सुनील शिरावळे, दरडग्रस्त रहिवाशी, तळीये
दावे फोल
बाधित कुटुंबांना सहा महिन्यांत घरांचा ताबा देण्यात येईल, असा दावा दुर्घटनेनंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केला होता.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत या घरांना धोका निर्माण होणार नाही, असाही दावा करण्यात आला होता. मात्र, हे दोन्ही दावे फोल ठरले आहेत.
राज्य सरकार आणि म्हाडाने बाधितांना घरांचा ताबा देण्यासाठी आतापर्यंत अनेक तारखा जाहीर केल्या.
मात्र, त्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वीच कामादरम्यान एका घराचा भाग वाहून गेला.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदोष कामाबाबत म्हाडाला नोटीस बजावत नाराजी व्यक्त केली.
आता बाधितांनीही कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.