नवी दिल्ली:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशवाऱ्यांवर सुमारे 254 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरद देताना ही माहिती उघड झाली आहे.
गुरुवारी राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी लेखी स्वरुपात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही रक्कम सुमारे 2 अब्ज 54 कोटी 87 लाख 1 हजार 373 रुपये इतकी असल्याचं म्हटलं आहे. हा खर्च गेल्या पाच वर्षांतील आहे.
फेब्रुवारी 2023मध्येही पंतप्रधान, राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री यांच्या परदेशवाऱ्यांवरील खर्च विचारण्यात आला होता. त्यावरील उत्तरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 20 कोटी रुपये खर्च झाल्याचं म्हटलं होतं. त्यात सुमारे 21 देशांतील दौऱ्यांचा समावेश होता. गुरुवारी एका स्वतंत्र उत्तरात मोदी यांच्या फेब्रुवारी 2021 ते जून 2023 या दरम्यान झालेल्या परदेश दौऱ्यावर सुमारे 30 कोटी इतका खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेब्रुवारी 2019 ते जून 2023 या पाच वर्षांमध्ये झालेल्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 254 कोटींचा खर्च आल्याचंही या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.