धोकादायक प्रवासामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी
दापोली:- सोमवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील ठिकठिकाणचे रस्ते उखडून गेले आहेत, तर काही ठिकाणचे रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.
त्याचप्रमाणे करजगाव मधलीवाडी जानेश्वरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील काॅजवेवरचा रस्ता पावसाच्या पुराने पार उखडून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे.
दापोली तालुक्यातील करजगाव येथील जानेश्वरवाडी मधलीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन नद्यांचा संगम होऊन त्या दोन्ही नद्या पुढे एकत्र वाहत बुरोंडी समुद्राला जाऊन मिळतात. जानेश्वरवाडी मधलीवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील काॅजवे हा आधीच धोकादायक झाला होता; कारण या आधी या पुलावरून प्रवास करताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे येथील स्थानिक असलेल्या दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला होता, असा हा काॅजवेवरील रस्ता आता पुराच्या पाण्याने पार उखडून गेला आहे. त्यामुळे तो बुजवून वाहतूकयोग्य करणे गरजेचे आहे. हा रस्ता इतका धोकादायक झाला आहे की, येथे कोणाचाही बळी जाऊ शकतो.
या रस्त्यावरील कॉजवेवर प्रकाशाचे कोणतेही साधन नसल्याने रात्रीच्या वेळी अथवा अंधारात वाहन चालकांना उखडलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होऊ शकतो तसेच पादचाऱ्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता येथे जास्त आहे. त्यामुळे रस्त्याची सुधारण करणे अत्यंत आवश्यक आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिक, प्रवासी आणि पादचाऱ्यांनी केली आहे.