मंडणगड:- कायदेशीर परवाना जवळ नसतानाही विक्री करण्याच्या उद्देशाने हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे मंडणगडमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत बाणकोट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 19 जुलै 2023 रोजी 4 वा.35 मि. दरम्यान पोलीस दूरक्षेत्र देव्हारेसमोरील रस्त्यावर राहुल दिलीप भोसले आणि विनिता फिलीफ केसकर यांच्या ताब्यातील वाहनामध्ये हरणाची शिंगे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना त्यांच्याकडे आढळून आली.राहुल दिलीप भोसले आणि विनिता फिलीफ केसकर यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, (1) ,44,49,51 प्रमाणे मंडणगड येथील बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाणकोट सागरी पोलिसांनी राहुल दिलीप भोसले आणि विनिता फिलीप केसकर यांच्याकडे सापडलेली हरणाची शिंगे तसेच पांढऱ्या रंगाची 3 लाख रुपये किमतीचे सुझुकी स्विफ्ट वाहन जप्त केले आहे.याबाबतचा गुन्हा 20 जुलै 2023 रोजी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास हा बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. मंडणगड तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. भोसले आणि केसकर यांच्याकडे हरणाची शिंगे कोठून आली याचा पोलीस शोध घेत आहेत.