कुडाळ:- तालुक्यात गुरूवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण होऊन सायंकाळी उशिरा नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले. प्रशासनाने पूरग्रस्त कुडाळ डाॅ.
बाबासाहेब आंबेडकर नगर, पिंगुळी, बिबवणे आदी ठिकाणच्या २० नागरिकांना कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या उपस्थितीत कुडाळ पोलिसांनी रोप, लाईप जॅकेटच्या सहाय्याने सायंकाळी उशिरा सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. महसुल व पोलिसांच्या या कामगिरीचे पुरग्रस्त नागरीकांनी कौतुक करत आभार मानले.
कुडाळ तालुक्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. सायंकाळपासून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, काळपनाका तसेच पावशी शेलटेवाडी येथील घरांमध्ये शिरले. कुडाळसह पावशी, वेताळबांबर्डे, बिबवणे, पिंगुळी, मांडकुली आदींसह नदीकाठच्या गावातील घरांना पाण्याने वेढा घातला. पिंगुळी खोडदेश्वर ब्रिज मांडकुली येथे पुराचे पाणी आल्याने मांडकुली गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे.दरम्यान पाण्याची वाढती असल्याने नागरिकांनी बाहेर पडू नये, आपत्कालीन स्थिती उद्भवली तर संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले आहे.