राजापूर:- गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला असला आणि राजापूर शहरातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा शहराला पडलेला वेढा काहीसा सैल झाला असला, तरी अद्यापही पूरस्थिती कायम आहे.
राजापूर शहरातील गणेशघाट परिसर, वरची पेठ रस्ता, शीळ-गोठणेदोनिवडे रस्ते कालपासून पाण्याखाली आहेत. मिठगवाणे, निवेली, साखरकोंबे-सडे चव्हाणवाडी आदी ठिकाणी घरांची पडझड होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरडग्रस्त गावांमधील लोकांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून राजापूर तालुक्यात पावसाला चांगलाच जोर असून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यातून अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन काल शहराला पुराचा वेढा पडला होता. दुपारनंतर सातत्याने वाढणार्या पुराच्या पाण्याने रात्री जवाहर चौकामध्ये धडक दिली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने तेथील पाणी रात्री ओसरले. त्यामुळे जवाहर चौक परिसर आज मोकळा झाला.
दरम्यान, आज सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने शहरातील पूरस्थिती कायम राहिली. शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घुसले. शहरातील जनजीवन विस्कळित झाल. सातत्याच्या पूरस्थितीमुळे बाजारपेठेतील व्यापरी कमालीचे सतर्क झाले आहेत. शहरानजीकचा शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव मार्ग पाण्याखाली राहिल्याने या मार्गावरील वाहतूक आजही दिवसभर ठप्प होती. ओणी-अणुस्कुरा रस्त्यावर पाचल येथे रस्त्यात आज सकाळी झाड कोसळले. मात्र काही कालावधीमध्ये झाड तोडून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
अतिवृष्टी आणि सोबत वार्याचा जोर राहिल्याने काही ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले. मिठगवाणे येथील कुंबावशीवाडी येथे विजेच्या तारेवर झाड पडून विजेचे तीन खांब मोडून पडले. निवेली येथील मधुकर आंबेलकर यांच्या घराजवळील भिंत कोसळून नुकसान झाले. मिठगवाणे येथील सार्वजनिक इमारतीवर, तर पन्हळेतर्फ राजापूर येथील चंद्रकांत धुळप यांच्या गोठ्यावर झाड पडले. साखर-मिरगुलेवाडी येथील तांबे यांच्या घराजवळील भिंत कोसळून नुकासन झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून सुरू आहेत.