देवगड:- तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले असून मुणगे, पोयरे गावाला वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला आहे.या गावात मोठ्या प्रमाणात पडझड होवून सुमारे 60 हजाराचे नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले असून गढीताम्हाणे मधलीवाडी रस्त्यावर सकाळी 11 वाजता सुमारास फणसाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. वादळी वाऱ्याने पोयरे येथील रामचंद्र केसरकर यांच्या मांगराच्या छप्परावर झाड पडल्याने सुमारे 5 हजाराचे नुकसान झाले आहे. तर पोयरे राणेवाडी येथील भरत सदाशिव राणे यांच्या गोठ्याचा छप्परावर झाड पडून कौले व वासे यांचे नुकसान झाले. मुणगे येथे संध्याकाळी 3.30 वाजता सुमारास जोराच्या वाऱ्यामुळे हरी दिनकर परूळेकर यांच्या चिरेबंदी पत्राशेडचे पत्रे उडून सुमारे 10,700 रूपयाचे नुकसान झाले. मुणगे स्मशानशेडवर जुनाट आंब्याचे झाड पडून सुमारे 38,600 रूपयाचे नुकसान झाले.