राजापूर:-पावसाळ्यामध्ये भूस्खलनाच्या अनेक घटना यापूर्वी राजापूर तालुक्यात घडल्या असल्याने यावर्षी अशा घटना घडल्यास त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
दरडप्रवण क्षेत्र असलेल्या राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथील खंडेवाडी, मसुरकरवाडी, नाडणकरवाडी, बौद्धवाडी या वाड्यांमधील सुमारे सहाशे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. खंडेवाडी येथील सुमारे नव्वदहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
संभाव्य आपत्ती आणि स्थलांतराच्या अनुषंगाने खंडेवाडी येथील लोकांशी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांनी संवाद साधून लोकांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी गुंड, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, मंडल अधिकारी बाजीराव पाटील, तलाठी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
धोपेश्वर खंडेवाडी परिसरामध्ये यापूर्वी दरड कोसळली होती. त्या परिसराला दरडग्रस्त ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. गतवर्षीही त्या परिसरामध्ये जमिनीला भेगा गेल्या होत्या. या परिसरातील संभाव्य आपत्ती अद्यापही टळलेली नसून त्या भागातील धोकादायक दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य दरडग्रस्तांना प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.