लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष,ग्रामस्थांना रात्रंदिवस करावा लागतोय याच पुलावरून प्रवास
खेड / सुदर्शन जाधव:- खेड तालुक्यात चोरवणे येथील लाकडी पुलावरून मुसळधार पावसात ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उमटत आहे.
चोरवणे हे गाव अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहून जाते. तसेच या पुलाला पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली झाडे अडकल्याने पूल पुर्णपणे सरकला आहे. स्वातंत्र्य काळानंतर १९६० ते १९६२ दरम्यान बांधलेल्या या पुलाची लांबी अंदाजे ५० मीटर व रुंदी तीन मीटर अशाप्रकारे आहे. चोरवणे गावातील आठ वाड्या उतेकरवाडी, बौद्धवाडी, गडकरवाडी, शिंदेवाडी, हनुमंतवाडी, डांगेवाडी, सुतारवाडी जखमीची वाडी यांना तसेच तालुका जिल्ह्याला दळण वळण संबंध जोडणारा एकमेव मार्ग आहे. नदीच्या पलीकडे उतेकर वाडी या ठिकाणी शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, रेशन दुकान, एसटी स्टॉप, शाळा, हायस्कूल ही सर्व साधने असल्याने रात्रंदिवस या वाटेने ये -जा चालू असते.
सध्या नाइलाजास्तव या पुलावरून जावे लागते. शासकीय कर्मचारी अधिकारी येऊन त्याची पाहणी करून छायाचित्र घेवून पंचनामा केलेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत यांनी यापूर्वीच ठराव घेऊन संबंधित कार्यालय व लोकप्रतिनिधी यांच्याकडे ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे या ब्रिजचे काम पूर्ववत लवकरात लवकर व्हावे अशी आमची चोरवणे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली होती परंतु जवळजवळ दोन वर्षे होऊन सुद्धा लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक आमदार आणि खासदार यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाचे काम होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.