मंडणगड:-करजगाव येथील मधलीवाडी तसेच जानेष्वरवाडी या करजगावातील दोन मोठ्या वाड्यांच्या लोकवस्तीकडे जाणाऱ्या नदीवरील कॉजवे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या दोन्ही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
दापोली तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशाचप्रकारे तालुक्यातील करजगाव येथील मधलीवाडी आणि जानेश्वरवाडी या दोन्ही वाड्यांकडे जाणारा कॉजवे हा पाण्याखाली गेल्याने रस्त्यातील कॉजवे कुठे आणि नदी कुठे हे पुराच्या पाण्यामुळे काहीच कळायला येत नाही, अशाप्रकारची जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती जेव्हा जेव्हा वर्षावृष्टी होते, तेव्हा तेव्हा निर्माण होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कॉजवे ऐवजी उंच पुल उभारण्याची मागणी केली होत. मात्र अजूनही ग्रामस्थांचा पुलाचा प्रस्ताव हा शासनदरबारी धूळ खातच पडला आहे. त्यामुळे कॉजवेच्या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी केली जाईल, असे वेळोवळी आणि वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ही हवेतच विरली आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा येथील जनजीवन विस्कळीत होण्यात झाला आहे.
दापोली तालुक्यातील करजगाव येथील या कॉजवेवरून 7 वर्षांपूर्वी प्रकाश शंकर बडबे हे दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर गेल्याच वर्षी भरत धोंडू धोपट या तरूणालाही आपला जीव गमवावा लागला होता. आणखीन किती बळी गेल्यानंतर करजगाव येथील मधलीवाडी आणि जानेश्वर वाडीकडे जाणाऱ्या कॉजवेची उंची वाढवून येथे पुलाची उभारणी केली जाणार आहे ? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ आता विचारत आहेत.