लांजा:-पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हक्काचे ठिकाण असलेले लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तेथील धबधबा वेगाने वाहू लागला आहे.
लांज्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत खोरनिनको धरण आणि तेथील मानवनिर्मित धबधबा हा गेल्या काही वर्षांत पर्यटकांचे हक्काचे ठिकाण बनले आहे.
खोरनिनको धरणाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य डोळ्यांत साठवत या धरणाचा नितांत सुंदर असा मनमोहक किनारादेखील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. जोरदार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी सध्या या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.