मुंबई:- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार (18 जुलै) पासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील शाळांना उद्या म्हणजेच गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत
त्यानुसार कोकण विभागातील सर्व शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
येत्या 24 तासांमध्ये उत्तर कोकण, राडगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसंच मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतलाय.
तसंच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि गडचिरोलीतील परिस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसंच जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
अतिवृष्टी होत असलेल्या भागांमधल्या शाळांना आणि ऑफिसेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसंच धोकादायक भागात एनडीआरएफ तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोकणात काय परिस्थिती?
रत्नागिरीमध्ये वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पाणी भरलं आहे.
नगरपालिकेच्या बोटी काही ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेची पथकं 9 ठिकाणी तैनात आहेत.
तलाठी, पोलीस आणि NDRF पथके 6 ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात 5 तलाठी, 3 पोलीस व 3 जवान आहेत. या पथकासोबत एकूण 4 बोटी आहेत.
कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. One way वाहतूक सुरू आहे.
दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे.
रायगडमधील सावित्री, आंबा, पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. कुंडलिका नदीनं इशारा पातळी गाठली आहे
त्यामुळे आज (19 जुलै) रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हस्के यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.