जैतापूर/ राजन लाड:-राजापूर तालुक्यातील 174 दर्यावर्दी खारवी समाज बांधव कुटुंबीय आणि मित्र परिवारासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला…
सलग 22 वर्षे तुळसुंदे येथील श्री तिरुपती बालाजी भक्त मंडळाचा उपक्रम.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या काठावर वसलेला दर्यावर्दी खारवी समाजाचा एकमेव गाव म्हणून तुळसुंदे गावाची ओळख आहे..
काही वर्षांपूर्वी आर्थिक समृद्धीने नटलेला हा गाव. जीवाला जीव देणारी आणि प्रेमळ माणसे असणारा हा गाव. काळाच्या ओघात आर्थिक समृद्धीला ओहटी सारखी सद्यस्थिती आहे.
मच्छीमारी हा व्यवसाय असणाऱ्या तुळसुंदे गावातील बहुतांश पुरुष मंडळी व्यवसायाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने सदैव दर्यावर स्वार असतात. साधारण नारळीपौर्णिमा म्हणजेच सप्टेंबर ते जून नऊ महिने हे व्यवसायाच्या निमित्ताने दर्यावर स्वार असतात तर मासेमारी बंद असण्याच्या साधारण तीन महिने म्हणजे जून ते ऑगस्ट नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले सर्व गावात आलेले असतात.
याच पावसाळ्याच्या कालावधीत म्हामदा सारख्या धार्मिक कार्यक्रमाबरोबर क्रीडा स्पर्धा ,सामाजिक उपक्रमांबरोबरच लगीनघाईही सुरू असते…
पावसाळ्यातील तीन महिने महिने आपल्या कुटुंबीयांसमवेत मजेत व्यतीत करण्यासाठी आणि त्या आनंदाची शिदोरी एकत्र करून नारळी पौर्णिमे नंतर पुन्हा एकदा दर्यावर स्वार होण्यासाठी बाहेर पडत असतात.
पुरुषांच्या बरोबरीनेच महिलावर्गही अन्य सर्वसामान्य महिलांपेक्षा अधिक जोखमीची आणि मेहनतीची कामे करताना दिसतात आपला पारंपारिक मच्छी व्यवसाय जोपासत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी मेहनत घेत असतात.
आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी गावात वेगवेगळे उपक्रम सुरू असतात गेल्या 22 वर्षांपासून याच गावातील अनेक तरुणांनी एकत्र श्री तिरुपती बालाजी भक्त मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाच्या माध्यमातून सहलीबरोबरच भारतातील श्रीमंत आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळख असलेल्या तिरुपती बालाजीच्या दर्शनाला आता सुरू केली सुरुवातीला केवळ आठ ते दहा लोकांनी सुरुवात केलेली ही प्रथा दरवर्षी वाढत जाऊन आता यावर्षी 174 लोकांसह श्री क्षेत्र तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले आहेत.
या सहलीचे नियोजन या मंडळाच्या माध्यमातून जवळपास तीन महिने अगोदरपासूनच सुरू असते या दर्शन सहलीसाठी येणाऱ्यांची नोंदणी करणे त्यानंतर प्रवासासाठी कोल्हापूर ते तिरुपती असे रेल्वेचे बुकिंग करणे तिरुपती येथे गेल्यानंतर राहण्याची आणि फिरण्याची व्यवस्था याचे नियोजन करणे याचे अत्यंत व्यवस्थितपणे मंडळाच्या माध्यमातून नियोजन केले जाते.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी तुळसुंदी येथून हे सर्व भक्त मंडळी कोल्हापूर मार्गे तिरुपतीला रवाना झाले आहेत जवळपास आठ दिवसाचा हा दौरा असून त्यानंतर हे सर्व मंडळी पुन्हा तुळसुंदे मुक्कामी परतणार आहेत.
गावी आल्यानंतर ही या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम बरोबर सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन ही करण्यात येत असते.
आज 19 जुलै रोजी हे सर्व लोक तिरुपती बालाजी येथे पोहोचले असून उद्या सकाळी सात वाजता दर्शनाला जाणार असून त्यानंतर परिसरातील सर्व देव देवतांचे दर्शन घेणार असल्याचे या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.