नवी मुंबई:- कोकणात प्रस्तावित असणारा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार करा, अशी जोरदार मागणी करीत आज बारसू प्रकल्पग्रस्तांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले. हा प्रकल्प जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न कराल तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनतेने दिला.
या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला.
विनाशकारी बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही ‘ईडी’ सरकारकडून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पा’मुळे केवळ बारसू, सोलगावमध्येच नाहीतर पंचक्रोशी आणि रत्नागिरी-कोकणाच्या निसर्गावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाला मोठय़ा संख्येने बारसूवासीय आणि विरोधक उपस्थित होते. बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघर्ष समिती आणि बारसू रिफायनरीविरोधी राज्यव्यापी लढा समिती यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ‘विनाशकारी रिफायनरी रद्द करा, कोकण वाचवा’ अशा घोषणा देत आझाद मैदान बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनतेने दणाणून सोडले. अभिजित चव्हाण, सत्यजीत चव्हाण, उल्का महाजन, प्रकाश रेड्डी, नितीन जठार, दीपक जोशी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचा आंदोलनाला पाठिंबा
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, हजारो वर्षांची आपली परंपरा असलेले येथे कातळ शिल्प आहे. ती कोकणची ठेव आहे. तिला जतन केले पाहिजे. मात्र आताचे सरकार तो वारसा संपवायला निघाले आहेत. त्यांना कोकणी माणूस माफ करणार नाही. रिफायनरीमधून नोकऱया मिळणार नाहीत. असलेले व्यवसाय जातील. शिवसेनाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही राऊत यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलनास पाठिंवा दिला. या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला. कोकणाला उद्ध्वस्त करणारा बारसू प्रकल्प आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिली.