राजापूर:- तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याचा कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
करक, पांगरी ही गावे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली असून तेथे अर्जुना पाटबंधारे प्रकल्पातर्फे धरण बांधण्यात आले आहे. ते धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरल्याने पाटबंधारे प्रकल्पाच्या लांजा बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकार्यांनी अर्जुना नदीच्या काठावरील करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगाव, गोठणे-दोनिवडे, शीळ, उन्हाळे, कोळवणवाडी, सौंदळ, आडवली, परटवली, बागवेवाडी या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. अर्जुना धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर कोणत्याही क्षणी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.