चिपळूण:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुण्यातील हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार, येथील कोकण पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांना देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. के. वडजे आणि पुण्याच्या हरित मित्र परिवार लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी ही निवड नुकतीच जाहीर केली आहे. पर्यावरण विषयाचा प्रचार-प्रसार, संवर्धन आणि जतन करण्याकामी अविरतपणे करत असलेल्या योगदानासाठी ही निवड करण्यात आल्याचे विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विद्यापीठ सभागृहात कुलगुरूंच्या उपस्थितीत, सोमवारी (दि. २४) दुपारी संपन्न होईल.
ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे धीरज वाटेकर हे सचिव आहेत. वाटेकर यांची ‘पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. यात चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही पाच पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी, जनी जनार्दन या चार चरित्र लेखनांचा समावेश आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या ज्येष्ठ कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यावरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेले आणि नुकतेच उपलब्ध झालेले, ‘हाफकिन’ मुंबई यांनी शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे ७०८ पानी चरित्र हे त्यांचे नववे पुस्तक आहे. या चरित्राला देशातील द्रष्टेनेते आणि प्रयोगशील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘संदर्भांची रेलचेल असलेला अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज’ अशा शब्दात गडकरी यांनी या चरित्राचे वर्णन केले आहे. विसाव्या शतकातील ग्रामीण कोकणचे प्रतिनिधित्व करणारे, आजच्या काळात उद्ध्वस्त होत असलेल्या, भारतीय संस्कृतीने उदात्त ठरवलेल्या मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडविणारे असे हे चरित्र असून याद्वारे विंचूदंशावरील लसीच्या निर्मितीची कहाणी वाचकांना प्रथमच उपलब्ध होत आहे.
वाटेकर हे कोकण इतिहास व संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण या करिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान देशाचा प्रवास केला आहे. पर्यटन, पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण, ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ते राज्यभरातील विविध नियतकालिकातून गेली २५ वर्षे लेखन करत आहेत. त्यांच्या पर्यावरणीय प्रबोधन भूमिकांचे यापूर्वी ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे, ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ, ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे, ‘पद्मश्री’ डॉ. विकास महात्मे आदींनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या विविध कार्यक्रमात कौतुक केले आहे.