खेड:- तालुक्यातील सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून धरण क्षेत्रात सरासरी १२०० मिमी पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यातील नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणे १०० टक्के भरली आहेत.
तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडीवली धरण, पंधरागाव विभागात तळवट-शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्ण केले आहेत.
मात्र नातूवाडी व शिरगाव धरण वगळता अन्य धरणातील पाण्यातून किती हेक्टर शेत जमीन ओलिताखाली येते हा संशोधनाचा भाग आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या धरणात पाणीसाठा दरवर्षी होत असतो; परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होणे अपेक्षित आहे.
यावर्षी १५ जुलैपर्यंत तालुक्यातील तळवट धरणात ४.६७ दलघमी, शेलारवाडी धरणात ८.०४६ दलघमी, नातूवाडी धरणात १८.२२४ दलघमी, पिंपळवाडी धरणात १८.८९६ दलघमी, कोंडीवली धरणात २.५५५ दलघमी, शिरवली धरणात ३.३६५ दलघमी एवढा पाणीसाठा आहे.
तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरवली लघु पाटबंधारे व पिंपळवाडी लघु पाटबंधारे तीनही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. शेलारवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प ५१.३५ टक्के भरला असून तळवट धरणामध्ये देखील ७२.३२ टक्के पाणीसाठा झाला आहे.