दापोली:- दापोली टाळसुरे साखळोली गावतळेकडे जाणाऱ्या मार्गावर साखळोली-शिवाजीनगर येथे कारीवणी नदी पूल आहे. या पुलावर टाकण्यात आलेल्या लोखंडी शिगा स्लॅप उखडून गेल्याने रस्त्याच्या वर आल्या आहेत.
यामुळे येथून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांचा या लोखंडी शिगांमध्ये पाय अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणाहून टाळसुरेमार्गे साखळोली गावतळेकडे जाणाऱ्या मार्गाचा उपयोग हा जसा साखळोली, गावतळे, शिवनारी, कोळबांद्रे या गावांना होतो तसा तो असोंड, रुखी, फणसू, कात्रण, देगाव, उन्हवरे, वावघर, दमामे, तामोंड, पोफळवणे, उर्फी, भडवळे आदी गावांनाही नजिकचा मार्ग म्हणून वाहतुकीसाठी होतो. या मार्गावर सकाळ-सायंकाळ एस.टी. वाहतुकीसह खासगी वाहतूकही दिवसभर सुरू असते. हा मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर साखळोली शिवाजीनगर येथील ‘कारवण्याचे ठिकाण’ हे स्थानिक नाव असलेल्या ठिकाणी कारीवणी नदी सुपरिचित आहे.
या नदीवर पुलाचे काम करण्यात आले होते, मात्र या पुलावरील स्लॅप उखडला असल्याने स्लॅपसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी शिगा रस्त्याच्या वर आलेल्या आहेत. त्यामुळे या लोखंडी शिंगांमध्ये पाय अडकून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पुलाचा स्लॅप उखडून वर आलेल्या लोखंडी शिगांवर रेती सिमेंटचा माल टाकून उखडलेल्या शिगा बुजवून रस्ता वाहतूकयोग्य करण्याचे काम प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे.