दापोली:- तालुक्यातील आंबवली बुद्रुक या गावातील रहिवासी मनोज सुरेश केळकर हे उत्तम शेतकरी आणि प्राणी आणि पक्षी मित्रसुद्धा आहेत. दररोज सकाळी नेहमीप्रमाणे ते फेरफटका मारण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले असता त्यांना आपल्या आंबवली बुद्रुक गावातील जंगलात जखमी अवस्थेत दुर्मिळ लाल चोचीचा उष्णकटिबंधीय पक्षी (Red billed tropicbird) सापडला.
जखमी झाल्यामुळे तो एका जागेवच निपचित पडून होता.
मनोज केळकर हे प्राणी पक्षी मित्र असल्याने त्यांनी त्या पक्ष्याचे व्यवस्थित निरिक्षण केले. जखमी झाल्यामुळे त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती. हा पक्षी दुर्मिळ असून तो स्थलांतरावेळी आला माहिती केळकर यांनी दिली तसेच त्याला वाचविण्यासाठी परिमंडळ वन अधिकारी दापोलीचे प्रकाश जगताप यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. परिमंडळ वन अधिकारी जगताप यांनी कोंगळे येथील वनरक्षक शुभांगी गुरव यांना आंबवली येथील घटनास्थळी जाऊन पक्ष्याची पाहणी करण्याविषयी सांगितले. गुरव यांनी आंजर्ले येथील सर्प मित्र प्रतीक बाईत व मनित बाईत यांच्या सहकार्याने आंबवली बुद्रुक येथे येऊन या पक्ष्याची तपासणी केली. त्यांनी पक्षी जिवंत असल्याची खात्री करून त्याला दापोली येथे उपचाराकरिता आणले.
दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश जगताप यांनी या पक्ष्याविषयीची माहिती चिपळूणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे (अति.कार्य.) यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ आणि लाल रंगाच्या चोचीच्या उष्ण कटीबंधीय पक्ष्याची (Red billed tropicbird ) सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन व तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय, दापोली येथे आणून या दुर्मिळ पक्ष्यावर सहाय्यक आयुक्त पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी उपचार केले. या पक्ष्याच्या विश्रांतीबाबत काही सल्लेही दिले आणि काळजी घेण्याबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकंद लोंढे यांच्या सल्ल्ला व मार्गदर्शनानुसार हा पक्षी पूर्णत: बरा झाला. त्याला आंजर्ले येथील समुद्रकिनारी नैसर्गिक अधिवासात सोडून मुक्त करण्यात आले.
दुर्मिळ पक्ष्याची माहिती
लाल चोचीचा उष्ण कटिबंधीय पक्षी (Red billed tropicbird ) हा दुर्मिळ पक्षी असून हा उष्ण कटीबंधीय पक्षी आहे. या पक्षाच्या तीन प्रमुख उपप्रजाती आहेत. त्यापैकी दापोली येथे उपचारासाठी आणलेली उपप्रजाती हिंदुस्थानच्या समुद्रकिनारी आढळून येतात. या पक्ष्यांची लांबी 90 ते 100सेंमी आहे. ज्यात 50सेमी लांब शेपटीचा समावेश आहे. पंखांचा विस्तार सुमारे 100 सेमी. आहे. प्रौढ पक्ष्याचे वजन सुमारे सुमारे 750 ग्रॅम असते. या पक्ष्यांना कडक किंचित वक्र आणि लाल रंगाची चोच असते. त्यांचे शरीरावरील पंख पांढरे असून टोकाला काळ्या रंगाचे असतात. दोन डोळ्यांमधून एक काळी पट्टी जाते. नर पक्षामध्ये लांब शेपटी वगळता नर आणि मादी समान दिसतात. हे किरमिजी रंगाचे उष्णकटीबंधीय पक्षी हे दुर्गम बेटांवर प्रजनन करणारे समुद्री पक्षी आहेत. हे पक्षी मासे, उडणारे मासे, क्रस्टेशियन्स आणि पाण्याच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्यात डुबकी मारून काढलेले इतर समुद्री जीव खातात. हे उष्णकटीबंधीय पक्षी विरळ वसाहतींमध्ये प्रजनन करतात. या पक्ष्यांच्या घरट्यात सामान्यत: एकच अंडे असते आणि अंडी उबवण्याचे काम प्रामुख्याने मादी पक्षी करते. लाल चोचीचा उष्णकटिबंधीय पक्षी 1962 आणि 1972 साली मुंबईच्या किना-यावर मृतावस्थेत सापडलेच्या नोंदी आहेत. हा पक्षी खोल समुद्रात अधिवास करत असून तो सातत्याने उडत असतो. आराम करण्यासाठी तो समुद्राच्या पाण्यावर पोहतो आणि केवळ प्रजनन हंगामात समुद्रातील बेटांना भेट देतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या पक्ष्याची छायाचित्रीत नोंद आजतागायत केवळ सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्सच्या खडकावर आहे.