चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला दीर्घकाळ लागला आहे. प्रत्यक्षात कोकणात पाच ते सहा महिने पावसामुळे काम होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाळ्यात काम करणे शक्य होईल का, या द़ृष्टिकोनातून विचार सुरू केला आणि आता ज्या ठिकाणी रस्ता करायचा आहे त्या ठिकाणी तात्पुरते प्लास्टिकचे छप्पर टाकून काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे पावसाळ्यातदेखील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन पूर्ण करणारच आणि यंदा चाकरमानी कशेडी बोगद्यातून गावाला येणार, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. दि.14 रोजी त्यांनी पनवेल ते सिंधुदुर्गपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची
पाहणी केली.
या दरम्यान रायगड जिल्ह्यातील रखडलेले काम, कशेडी घाटाला महत्त्वाचा पर्याय ठरणारा कशेडी बोगदा, परशुराम घाट, आरवली ते काटे, वाकेड अशा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. दुपारी चिपळूण येथे ते काही काळ थांबले. त्यांनी या पाहणी दौर्यामध्ये गणेशोत्सवापूर्वी कोणत्याही परिस्थितीत एक लेन पूर्ण करणारच. म्हणजे चाकरमानी कशेडी घाटाऐवजी कशेडी बोगद्यातून येतील आणि त्यांचा प्रवास 45 मिनिटांनी कमी होईल. यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पावसाळ्यातही काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्यासाठी प्लॅस्टीक शेडखाली काँक्रीटीकरण कऱण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रथमच हा प्रयत्न मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात येत आहे. याचप्रमाणे महामार्गावर काँक्रिटीकरण करून जास्तीत जास्त गणेशोत्सवापर्यंत एक लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पावसाळ्यात या कामाला वेग येईल. कशेडी घाटातील दोनपैकी कोणताही एक बोगदा गणेशोत्सवापूर्वी सुरू करावा व चाकरमानी या बोगद्यातून येतील या बाबत संबंधितांना सूचना दिल्या. यानंतर त्यांनी चिपळुणातील परशुराम घाटाची देखील पाहणी केली. घाटात कोसळणार्या दरडी व काही ठिकाणी काँक्रीटीकरणाला गेलेले तडे याची माहिती जाणून घेत संबंधितांना सूचना देखील केल्या.
कोकणातील पावसामुळे काँक्रीटीकरणाचे काम रखडत होते. मात्र हे काम वेगवान होण्यासाठी हा नवा पर्याय निवडण्यात आला आहे. सुमारे वीस फूट उंचीची प्लॅस्टीकची शेड उभारून त्या खालील भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले जात आहे. काँक्रीटीकरण केल्यानंतर बारा ते चौदा दिवस त्यावर पाऊस पडणे योग्य नसते. त्यामुळे गतीमान कामासाठी हा नवा फंडा प्रथमच अवलंबिला आहे. त्या दृष्टीने संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या होत्या, असे ना. चव्हाण यांनी सांगितले.