मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील विरार, बोळींजमधील आणि पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पीएमएवायमधील घरांसाठीची उत्पन्न मर्यादा वार्षिक तीन लाखांवरून सहा लाख रुपये केली आहे.
त्यामुळे आगामी सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या पीएमएवायमधील घरांची विक्री होऊ शकेल, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मेमध्ये काढलेल्या ४,६५४ घरांच्या सोडतीतील पीएमएवायमधील ९८४ पैकी विक्री होऊ न शकलेल्या ६५६ घरांचा आगामी सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
‘सर्वांसाठी घरे’ अशी घोषणा करीत केंद्र सरकारने पीएमएवाय योजना आणली असून या योजनेद्वारे आर्थिक दुर्बल घटकांना (अत्यल्प गट) परवडणारी घरे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेअंतर्गत म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळाकडून मोठ्या संख्येने घरे बांधण्यात येत आहेत. कोकण मंडळ खोणी, गोठेघर, शीरढोण, बोळींज येथे पीएमएवायची घरे बांधत आहे. जसजशी या प्रकल्पातील घरे बांधून पूर्ण होतील, तसतशी सोडतीद्वारे त्यांची विक्री केली जात आहे. मात्र पीएमएवायमधील घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कोकण मंडळाने १० मे रोजी काढलेल्या ४,६५४ घरांच्या सोडतीत खोणी, गोठेघर, शीरढोण, बोळींज येथील ९८४ घरांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या घरांसाठी केवळ ३५१ अर्ज प्राप्त झाल्याने उर्वरित घरे शिल्लक राहिली. तर सोडतीनंतर ३५१ पैकी काही विजेत्यांनी घरे परत केली. त्यामुळे ९८४ पैकी केवळ ३२८ घरे विकली गेली आहेत. तर ६५६ घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. आता या घरांचा आगामी सोडतीत समावेश करण्यात आला आहे. आगामी सोडतीत या घरांची विक्री होईल का या चिंतेत असलेल्या कोकण मंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने नुकतीच एमएमआरमधील पीएमएवाय प्रकल्पातील घरांसाठीची उत्पन्न मर्यादा वाढविली आहे. आतापर्यंत वार्षिक तीन लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांनाच ही घरे घेता येत होती. त्यामुळे तीन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या इच्छुकांना अर्ज करता येत नव्हता. पण आता वार्षिक सहा लाख रुपये अशी उत्पन्न मर्यादा केल्याने या घरांना प्रतिसाद वाढेल, अशी आशा मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. या घराची किंमत १५ लाख ते २१ लाख रुपये आहेत. उत्पन्न आणि घरांची किंमत यात तफावत असल्याने अनेकांना गृहकर्ज मिळणे कठीण होत आहे. परिणामी घरे परत करण्यात येत असल्याचे वा अर्जच भरण्यात येत नाही. पण आता मात्र या अडचणी दूर होतील आणि प्रतिसाद वाढेल, आगामी सोडतीत पीएमएवायमधील घरे विकली जातील, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याच दिवशी केंद्र सरकारने एमएमआरमधील पीएमएवाय प्रकल्पातील घरांची उत्पन्न मर्यादा वाढविली. या सोडतीत पहाडी गोरेगावमधील १,९४७ घरांचा समावेश पीएमएवायमध्ये होता. मुंबई वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणारा वर्ग तुलनेत कमी असल्याने म्हाडाने ही सोडत जाहीर होण्याआधीच एमएमआरसाठीची उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयांऐवजी सहा लाख रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी त्यावेळी अमान्य झाली. त्यामुळे पहाडीतील १,९४७ घरांसाठी तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा कायम राहिली. पण या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या घरांसाठी २३ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे ही सर्व घरे विकली जातील. पण सहा लाख रुपये उत्पन्न मर्यादेचा फायदा तूर्तास तरी मुंबईकरांना होणार नाही. कारण म्हाडाचा पीएमएवायमधील घरांचा एकमेव प्रकल्प पहाडीमध्ये असून या घरांसाठीची अर्ज विक्री – स्वीकृती पूर्ण झाली असून आता लवकरच या घरांसाठी सोडत निघणार आहे.