सह्याद्री शिक्षण संस्थेच्या बी.एम. एस. विभागाच्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
चिपळूण/प्रतिनिधी:- सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशस्वी घोडदौडमध्ये आपल्या सर्वांचा हात असून पुढील काळात संस्था अजून अद्ययावत करू. आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी बी. एम. एस. विभागाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी दिली. तसेच व्यावसायिक शिक्षणासोबत समाजात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या, आर्ट्स अँड सायन्स कॉलेज सावर्डे मध्ये बी.एम.एस या पदवीधर अभ्यासक्रमाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झाली. सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षाच्या बी.एम.एस विभागाच्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्यासह एम.बी.ए च्या प्राचार्य डॉ. अश्विनी महाडिक, प्राचार्य तानाजी कांबळे, प्राचार्य एकनाथ गावडे व प्राचार्य रतन कांबळे पालक प्रतिनिधी शिलभद्र जाधव तसेच विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली व नंतर सर्व पाहुण्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांचे सह्याद्री परिवारामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना विभाग प्रमुख प्रा. तुषार बिजीतकर यांनी मागील वर्षी पार पडलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. बी.एम.एस चे महत्व सांगताना पुढील काळातील वार्षिक नियोजन त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर मनोगत व्यक्त करताना पालक प्रतिनिधी श्री. शिलभद्र जाधव यांनी महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या. प्राचार्य गावडे यांनी व्यवस्थापन क्षेत्राचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दात समजून सांगितले.
एम.बी.ए.च्या प्राचार्य डॉ. अश्विनी महाडिक यांनी सध्याच्या व भविष्यातील असलेल्या व्यवस्थापन क्षेत्रातील संधी स्पष्ट केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला असून पुढील काळात महाविद्यालयात त्यांची प्रगती होताना दिसेल याची खात्री दिली. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर न थांबता पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील पूर्ण करावा असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी हजर होते.